*कान्हेवाडी तर्फे चाकण….स्वच्छ, सुंदर व स्मार्ट गाव* -- सचिन अडसुळ
कान्हेवाडी तर्फे चाकण हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये जिल्हा मुख्यालयापासून 31 तर तालुका मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. गावांमध्ये इंद्रायणी ही मुख्य नदी आहे. विशेष म्हणजे कान्हेवाडी हे गाव देहू या तिर्थक्षेत्राजवळ आणि खेड-मावळ आणि हवेली या तिन्ही तालुक्यांच्या सीमेलगत वसलेलं आहे. गावाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 973 असून गावाची कुटुंब संख्या 204 आहे

गावातील शाळा अन् अंगणवाडी म्हणजे सौंदर्याने भरलेला निसर्गातील एक चमत्कारच आहे. या शाळेत आयुर्वेदीक झाडे, पक्षांसाठी उद्यान, मुलांना खेळायला विविध साधने, गवताचं प्रशस्त क्रीडांगण, प्रशस्त स्वच्छता सुविधा या सर्व बाबींमुळे शाळेमध्ये मुलांना शिकण्यात आनंद मिळतोच पण घरासारखे वातावरणही निर्माण होतं. शाळेत स्वच्छता विषयक विविध धडे मुलांना दिले जातात. यातून कान्हेवाडी गावामध्ये उद्याची स्वच्छ पिढी तयार होत आहे. तत्कालीन आदर्श सरपंच नवनाथ पवार यांनी गेले पंधरा वर्षांत गावासाठी मेहनत घेऊन गावातील प्रत्येकाला चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा एक अधिकार मिळवून दिला आहे. शासनाच्या विविध योजना आणने असेल व विविध कंपन्यांकडून CSR मिळविणे असेल किंवा गावातील लोकसहभाग घेणे असेल या सर्व बाबीतून गावाला एक स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सरपंच पवार यांना व गावातील सर्वच ग्रामस्थांना सलाम.
गावाने निर्मलग्राम पुरस्कारांबरोबरच महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, गृहस्वामिनी पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती पुरस्कार, लोकमत ग्राम गौरव पुरस्कार, राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत. ग्रामपंचायतीला २००८ मध्येच ISO मानांकन प्राप्त झाले आहे. कान्हेवाडी तर्फे चाकण गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात 2017 मध्ये विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे. कान्हेवाडी गाव आता देशभर चर्चेचा विषय बनला आहे. स्वच्छता क्षेत्रातील गेले वीस वर्षांतील शाश्वत काम पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. भविष्यात इतर गावांना स्वच्छ भारत मिशन सारख्या योजनांसाठी एक आदर्श गाव म्हणून… एक स्वच्छ गाव म्हणून पाहण्यास निश्चितच आनंद होईल.
No comments:
Post a Comment