सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ या स्पर्धेत #तृतीय_क्रमांक पटकावलेलं गाव म्हणजे #बिदाल.
हे गाव म्हणजे अनेक सामाजिक बदलांचे उगमस्थान आहे.
महाराष्ट्रातल्या इतर गावांमध्ये जेव्हा ग्रामपंचायत निवडणूकीत गटा-तटाचं राजकारण आणि भांडणं होतात.
तिथेच बिदालमध्ये मात्र गेल्या ५० वर्षांपासून सरपंच पदाची निवड बिनविरोध होत आहे.
एखाद्या गोष्टीतच शोभेल अशा बिदाल गावात वॉटर कप स्पर्धेदरम्यान आलेले हे काही अनुभव.
लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या तुलनेत साताऱ्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणजे बिदाल. जवळपास सहा हजारांच्या लोकसंख्येच्या या गावात ५० वर्षांपासून बिनविरोध सरपंच आणि ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांची नेमणूक होत आहे हे विशेष. शासनाने ग्रामपंचायत निवडणूकीत महिला आणि इतर वर्गियांसाठी आरक्षण आणण्याच्या आधीपासून आमच्याकडे आरक्षणाशिवाय आणि बिनविरोध महिला तसेच सगळ्या जातीधर्माचे लोक सरपंच होत आहेत असं इथले रहिवासी अभिमानाने सांगतात.
गावागावातं असलेले राजकीय गट-तट, जातीय किंवा धार्मिक असे कोणतेही तंटे बिदालमध्ये नाहीत. पंचायतीत बसलेले ६८ वर्षांचे #चंदुभाई_डांगे मोठ्या उत्साहाने सांगत होते. “बिदालमध्ये मुसलमानांची चार घरं आहेत पण आम्ही वेगळे आणि हे वेगळे असा भेद कधीच इथं झाला नाही. मी १९९४ पासूनच्या सगळ्या ग्रामसभा आणि सरपंच पाहिलेत पण कधीही एखाद्या पदासाठी किंवा सामाजिक तेढ म्हणून भांडणं झाल्याचं एकही उदाहरण नाही.”
संपूर्ण बिदाल गाव चंदुभाईंना #डांगेचाचा म्हणून आदर देतं. चाचा २५ वर्षे एअर फोर्समध्ये टेक्निशिअन म्हणून काम करत होते. शस्त्रास्त्रांची देखभाल करणं, ती फायटर प्लेनला लावणं असं जोखमीचं आणि जबाबदारीचं काम त्यांनी केलं. कामानिमित्त देशभर फिरलेले चाचा रिटायर झाल्यानंतर गावी परतले. ज्या हातांनी त्यांनी भारतमातेचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली होती त्याच हातांनी आता ते मायमातीचं रक्षण करण करत आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी योजलेल्या सगळ्या कामांमध्ये चाचांनी १०० टक्के वेळ दिला. मोठं क्षेत्रफळ असलेल्या बिदाल गावचा कोपरा न कोपरा या कामासाठी त्यांनी पिंजून काढला. या दगदगीत त्यांना साथ दिली ती त्यांच्या सायकलीने. दररोज वेगवेगळा सुविचार लिहलेली ही सायकल चालवत प्रवास करणारे चाचा हे चित्र बिदालकऱ्यांना इतकं परिचित झालं होतं की एक दिवस जरी चाचांनी खाडा केला तर लोक घरापर्यंत त्यांची विचारपूस करायला पोहोचायचे.
पुढच्या पिढीला दुष्काळापासून सुटका मिळावी या विचाराने बिदालकरांनी श्रमांची शर्थ केली होती. त्यात ६८ वर्षांचे डांगे चाचाही मागे नव्हते. #यंदाची_ईद त्यांनी शोषखड्डे करून साजरी करायची ठरवली आणि या त्यांच्या निर्णयाला बायको झुबैदा भाभींनी मोकळ्या मनाने पाठींबा दिला. यावर्षीच्या ईदला डांगे परिवाराने घरातल्या कोणालाही नवे कपडे केले नाहीत उलट त्यावर होणारा खर्च पानी फाउंडेशनच्या कामासाठी वापरला. डांगे चाचांसारखेच गावातला प्रत्येकजण जलसंधारण करण्यासाठी झटत होता.
बिदालच्या पुष्पांजली गावच्या आरोग्य खात्यात आशा सेविका म्हणून काम करतात. या स्पर्धेसाठी पानी फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगला त्या गेल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळामुळे गावातल्या लोकांवर झालेल्या परिणामांच्या त्या साक्षीदार आहेत.
“गेल्या दहा वर्षांपासून आम्ही दुष्काळाशी झुंजतोय. दोन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे चारा छावण्यांचं प्रमाण वाढलं होतं. त्यावेळी गावात एक म्हातारी एकटीच राहत होती. तिच्याकडे असलेली एकुलती एक म्हैस चारा छावणीला घेऊन जात असताना पाण्याच्या टॅंकरखाली चिरडली आणि मेली. आरोग्य खात्यात असल्यामुळे गावाचं आरोग्य कसं बिघडत चाललंय हे मी जवळून बघत होते. या पाण्यापायी अनेक महिलांचा गर्भपातही झालाय. जुलाब, मुतकडा तसंच मुत्राशयाचे अनेक आजार गावातल्या अनेक बायकांना जडले.”
ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर गावातला एकही उंबरठा त्यांनी सोडला नाही. तब्बल एक महिना घरोघरी बायकांना वेगवेगळी उदाहरणं देत त्या पाणलोटाच्या कामाचं महत्त्व समजावून सांगत होत्या. “घराबाहेर परातीत एक तांब्या पाणी टाकून ठेवा आणि दिवसभरात त्यात किती पाणी राहतं हे पहा.” असं सांगत त्यांनी शाळेत प्रत्येकाने शिकलेल्या बाष्पीभवनाचा थेट प्रयोगच बायकांना करून दाखवला.
याचा परिणाम असा झाला की टॅंकर आला की कळशा घेऊन धावणाऱ्या आणि काटकसरीने पाणी वापरणाऱ्यांना पाणी कसं आणि कुठे कुठे वाया जातं याचा हिशोब लावता येऊ लागला. पुष्पांजली ताईंच्या या जिद्दीमुळे बायकांना शोषखड्डे, सी.सी.टी., डीप सी.सी.टी. यांचं महत्त्व समजलं आणि प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून बिदालमधील स्त्रियांनी श्रमदान केलं.
“बिदाल गावातल्या अनेकांकडे स्वतःच वाहन आहे. त्यांच्या बायका घरातून बाहेर पडल्या की थेट गाडीतच बसायच्या. घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या त्या बायकांनी कधी स्वतःचं शेतही बघितलं नव्हतं. अशा बायकासुद्धा स्पर्धेचे ४५ दिवस गावातल्या इतर महिलांसोबत ट्रॅक्टर मध्ये बसायच्या आणि श्रमदान करायच्या.” पुष्पांजली मगर यांनी सांगितलेली ही घटना बिदाल गावातल्या गृहीणींच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती.
खरंतर सहा हजारांच्या बिदाल गावात प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखणं तसं कठीणच पण स्पर्धेदरम्यान होणाऱ्या ग्रामसभा आणि श्रमदानाच्या निमित्ताने वरच्या काही घटनांमधून माणसे एकमेकांना ओळखू लागली. स्वयंप्रेरणेने अनेक बाबतीत बदल करणारे बिदाल आता गावच्या पाण्याबाबतही जागृत झाले आहेत तेव्हा बदल हीच बिदालची दुसरी ओळख पुन्हा एकदा ठळक झाली आहे.
No comments:
Post a Comment